Monday, September 13, 2010

घरटे

घरट्यातुनी उडाले

पक्षी पंख फुटलेले

मागे रिक्त उरलेले

घर एकटे एकटे



माय वडिलांची हाक

बोलाविते घराकडे

प्रतिक्षेत डोळे आर्त

लागलेले वाटेकडे

मागे वळा पाखरांनो

घर एकटे एकटे



अंगणात वृक्ष दोन

कसेबसे उरलेले

गळलेली पर्णपाती

भुईवर झुकलेले

सावराया मागे फिरा

घर एकटे एकटे



काळजाला तडे जाती

गळे सदा छप्परही

ममत्व गाभुळलेले

डोकावते खिडकीशी

परत या उभाराया

घर एकटे एकटे



मुक्ता शर्मा
13/3/2009

No comments:

Post a Comment