Saturday, March 9, 2013

मनास खुळ्या



मनास खुळ्या लागले वेड "काळ्या मातीचे".
बिज रुजवुनी, गीत गाईन मातीचे.
उंच उंच जाऊनी जरा झुकेल आकाशी,
मातीस मागेल जागा "माझी जराशी".

मनास खुळ्या लागले वेड "झिम्माड वा-याचे"
रेखेल मातीच्या अंगणी रिंगण फुगडीचे.
कोप-यात क्षितिजाच्या जाउन जरा बसेन.
ओंजळीत माझ्या सूर्य ढळता आणेन.

मनास खुळ्या लागले वेड "निळ्या आकाशाचे"
निलवर्ण लेवुनी माळेन केसात पिस मयुराचे.
मातीतून उभारीन पुन्हा मधुबन जुनेच नव्याने.
कणा कणात मागेन मातीला सूर "माझ्या सानिकेचे".

मनास खुळ्या लागले वेड "नितळ पाण्याचे"
मातीतूनी स्त्रवेल घेउन प्रतिबिंब आकाशाचे.
जलदालीचा पुर सारा सामावुनी घेइन.
सागराच्या पाण्याला थोडासा गोडवा देइन.

मनास खुळ्या लागले वेड "दिव्य तेजाचे"
भाळी बिंबविन कुंकू त्याच्याच अमरत्वाचे.
निजे्न पुन्हा पुन्हा जेव्हा मातीच्या कुशीत,
लुकलुकत राहिन सदैव आकाशाच्या प्रांगणात.

मुक्ता शर्मा
सिंगापूर
१६ -१०-२००८
९.४८

आकाश


आकशाच्या पायरीवर
एक पाउल टाकले
आणि कळलेच नाही
की मी आकाश झाले..

आकाशाचे लिंपण
अंगावर लिंपत गेले..
.
.
आता कोणत्या
विश्वव्यापी पोकळीला
व्यापून उरणार होते
हे सुद्धा निळाइला
कळले नाही...

मग ,
उरुन पुरणार की
पूरुन उरणार?
हे समजायचे भानही
निळाईतून सुटले नाही..

शिल्लक राहिलेल्या
दोन चार चांदण्या
आणि एखाद दूसरा चंद्र सूर्य
दान देऊन टाकला..
संपले सर्व काही..
तर समोर पुन्हा अफाट दरी
निळी निळी
आणि त्यात मूर्ती सोवळी..

मुक्ता

Wednesday, March 6, 2013

कोल्हाटीण

झिम्माड वार कसं, पदराला झोंबतयं.
लव लव पात, बघ वा-यावर डोलतयं.

सावर सावर म्हणत, जीवाला सावरतेयं.
चार काठी दोरीवर, स्व:ताला तोलतेयं.

फड फड डफलं, दादला वाजवतोयं .
दमादमानं पाऊल,  माझं पुढं पडतयं.

जगवायच म्हणजी, एक कसरतच हायं.
कुणाला सांगु ह्यो ,खेळाचा नियमच हायं.

रडू नको बाळे माझे, दुधाचा तोष हायं.
डोळा पाणी आलं तर, खेळाच मोल जायं.

मुक्ता