Friday, May 11, 2012

ठिगळं




उसवलेल्या आकाशाला
मी शिवत बसले होते..
आणि तू .....
दुसरे टोक उसवत जात होता.
;
;
तरी ठिगळावर ठिगळं
अन आकाशाला साधांयचा
खुळा अट्टाहास.
.
.
कधी कुणाला सगळ आकाश मिळालय का?

मुक्ता
Feb 18, 2009  

ओलीचिंब

वर्षा राणी
पाणी पाणी
पानो पानी
हिर्वी गाणी

हिर्वी हिर्वी
वसुंधरा
ओलाविंब
गंध सारा

गंध मंद
मृदगंध
आसमंत
चिंब धुंद


चिंब चिंब
ओली नक्षी
खोप्यामध्ये
सारे पक्षी


सारे झरे
मंजुळले
काठोका्ठी
बहरले

बहरला
गिरी माथा
ऊन झाले
शांत आता

शांत उन
ओले आता
बोले मौन
ओले होता

ओली ओली
पाय वाट
साजणाची
पाहे वाट

वाटेलाच
विचारीते
आहे कोठे
नाथ माझा
;
;
माझ्या विना
त्याची सुद्धा
विझलेली
प्राण गाथा
;
;

प्राणातही
जीते आता
धग धग
ओली तीची
;
;
;
ओल्यातच
जळालेली
प्राणांचीच
समिधाही
;
;
समिधांची
हविशाही
तिच्यातच
स्वहा लेली

स्वहा झाला
प्राण आता
उरे अंती
काय आता
;
;
काय देउ
आता तुला
माझे मला
गेले राया
;
;
गेलेल्या त्या
राउळाची
उरे फक्त
भग्न रास
;
;
भग्न राशी
आसुसल्या,
तेलवात
दिवा लावा
दिवा जळे
सारी रात
उरे अंती
काळी रेघ
;
;
काळी रेघ
काजळाची
काळजात
दाटे मेघ
;
;
मेघनाद
निनादतो
रिक्त झाल्या
अंतरात
अंतरात
मग फुले
एक ज्योती
आनंदाची
;
;
आनंदाच्या
वाटेवरी
रेलचेल
वचनांची
;
;
वचनांच्या
जोडीलाही
हात तुझा
होता हाती
;
;
हात घेता
हृदयाशी
हुंकरही
दाटलेले
;
;
दाटलेल्या
नभी आता
थेंब थेंब
दान देते
देता घेता
वचनांची
सरे कशी
सारी रात
;
;
रातीच्याही
सोबतीला
चांदव्याची
मत्त रेषा
;
;
रेषा कृष्ण
कुंतलाच्या
भाळावरी
भाळलेल्या
;
;
भाळलेल्या
तुझ्या रुपा
माझा मला
वाटे हेवा.
हेवा वाटे
मनो मनी
तुझा स्पर्श
तनो मनी
;
;
तनो मनी
बहरला
रान थवा
पाखरांचा
;
;
पाखरांच्या
साथीला ग
टिमटिम
काजव्यांची
काजवाही
विझला ग
किर्र रात
माथी चांद
;
;
चांद तोही
मातेल ग
रुप तुझे
झाक ना ग
;
;
झाक तुझे
यौवनही
लागेल ग
दृष्ट त्याला
;
;
दृष्ट काढे
रात राणी
ओवाळुनी
प्रेमफुले
प्रेमगीते
नि:शब्दाची
गात राहु
सारी रात
;
;
रातीच्याही
साथीलारे
चांदवा तो
देई साथ
;
;
साथी तुझ्या
माळेल रे
चांदव्याची
चांद वे्ली
;
;
वेलीवरी
उजळेल
शुक्राचीही
चांदणी रे;
;
चांदणीच्या
ओठी आता
तुझी माझी
प्रित गीता.
प्रेम गीता
पावरीची
राधेचीही
मिरेचीही
;
;
मिरा भक्ति
राधा शक्ति
राया तुझी
मीच प्रीती
;
;
प्रीती रीती
ना जाणते
तव प्रेमा
आसुसते
;
;
आसुसल्या
माझ्या डोळा
लागला रे
तुझा लळा
;
;
तुझी आता
होउ राहे
मनस्विनी
मानसिही

.
मानसिच्या
मंदिरीही
दिवा जळे
सारी रात
;
;
सा-या राती
गाती आता
साजणाची
प्रेम गाथा
;
;
प्रेमा संगे
अधरांची
विणा वाजे
मधुरशी
;
;
मधुरत्या
सूरामध्ये
दिवा वात
तेजाळते
;
;
तेजाळल्या
दिशांनाही
अर्थ नवा
लागे लागे


लागलेल्या
अर्थालाही
गर्भात मी
जोपासते
जोपासले
कोंब सान
त्याला पाती
फ़ुटे छान

फ़ुटताना
धुमारे ते
मन झाले
रूण झुण

ऋण सात
जन्मांचे हे
कसे कुठे
फ़ेडू सांग

सांग गडे
कोणासाठॊ
मांडला हा
खॆळ छान
खेळ छान
मांडियला
साजणारे
तुझ्यासाठी
;
;
तुझ्यासाठी
सारी दु:खे
सुख केली
पापणीने
;
;
पापणीच्या
मायेखाली
प्रीत राहो
सदा ओली
;
;
ओली ओली
ओलीचिंब
तुझी नाथा
वेडी राणी
;
;
वेडी राणी
गायी गाणी
डोळा आले
बघ पाणी
पाणी वाहे
झुळझुळ
आठवांची
हुळहूळ
;
;
हुळहुळे
मन माझे
सख्या कारे
टाकी जाळे
;
;
जाळ्यातल्या
आठवांना
पाखरांची
पंखजोडी
;
;
पंखामध्ये
साठविले
रान सारे
तुझ्यासाठी
;
;
तुझ्यासाठी
जीव माझा
मन माझे
प्राण माझे
;
;
प्राणातही
ज्योत जळे
घेता घेता
तुझे नाम
तुझे सारे
सारे काही
माझे आता
काही नाही
;
;
काही क्षण
फुललेले
काही क्षण
मिटलेले
;
;
मिटलेल्या
क्षणांतही
तुझे रुप
साठलेले
;
;
साठलेल्या
रुपांतही
माझे मन
गुंतलेले
;
;
गुंतलेल्या
मनातही
प्रेमधागे
गुंफलेले
;
;
गुंफलेल्या
धाग्यातरे
बिज बघ
अंकुरले
अंकुरले
बीज आणि
जन्म जणु
सार्थ झाला

.

झाले मन
कृतकृत्य
जीवनाला
रंग आला

.

असा रंग
बहरला
गीत स्फ़ुरे
हळुवार

.

हळुवार
गीत गाता
तनु डोले
लयदार

.

लय अशी
सापडता
काया झाली
धन्य धन्य

.

धन्य धन्य
काया होता
श्वास झाले
धुन्‍द फ़ुन्‍द !
धुंद फुंद
मिती झाल्या,
मति तिथे
गुंगलेल्या
;
;
गुंगलेल्या
क्षणांवरी
मोहजाल
कशाचेरे
;
;
अशी कशी
मी रे राया
तुझ्या साठी
आतुरले
;
;
आतुरल्या
नयनीही
अंकुरला
बिज दिसे
;
;
बिज पोटी
वाढे वाढे
नाते असे
दृढ व्हावे
13 Feb 2009 - 4 March 2009
Mukta Pathak Sharma



एकली






एकली उभी कदंबाखाली
ओलांडूनी गावाची वेस !
प्रश्नांची गर्दी डोळ्यात दाटली
माथ्यावर भूरभूरती केस !
अबोल बन्सुरी ती बोलू लागली
नाथा का धरीला परदेस ?

14-04-2012
मुक्ता पाठक शर्मा 

पिंपळ पानावरची जाळी




पिंपळ पानावरची जाळी
अनाम संकेत लेवून आली.
दाबून राहिल्या हुंकाराला
अवचित नवी बोली कळली.
पिंपळ पानावरची जाळी

आभाळ घाई मलाच होती.
आठवांची पाने मिटली.
खूण तुझी मागे सरली.
पानातच पान सुकून उरली.
पिंपळ पानावरची जाळी

नकळत आज धूळ झटकली
उगाच सारी पाने पलटली
स्मृतींनी तव मी गहिवरली.
नयनी माझ्या सय दहीवरली.
पिंपळ पानावरची जाळी


का कधीच कळले नाही?
तू शिंपली होती इत्तर शाई.
मधल्या रेषेभोवती होती.
तुझ्या खुणांची घन वनराई.
पिंपळ पानावरची जाळी
अनाम संकेत लेवून आली.

14/04/2012
मुक्ता पाठक शर्मा 

वर




उपवर कन्येला पहायला 
उपवर आला..
खालून वर वरून खाली ,
न्याहाळतच  राहिला.
उपवर कन्येला पहायला 
उपवर आला..

कन्येचे काळीज होऊ लागले
 वर खाली .
नजर वर करून पाहाण्याची,
हिम्मत तिला नाही झाली.


वराकडे वर करून पाहिले ,
तर संस्कार काढतील.
चुकून डोळ्याला डोळा भिडला तर,
न जाणे नकारच देतील.


वराला वरायचं झालं ,
तर वर बघणं आलचं.
नाहीतर कोणताही धोंडा ,
गळ्यात बांधण झालच.


शेवटी हिम्मत करून,
वराला नजर वर करून पाहिलं.
नजरेला नजर भिडवून ,
तिकडून होकाराचं हसण हलकेच टिपलं.

15/04/2012
मुक्ता पाठक शर्मा 


Monday, May 7, 2012

वेग

त्याच्ं नेहमीच कोड्यात बोलणं
काही न समजून माझं हसं होणं
कधी काम काळ वेगाच्या नशेत त्याचं धुंद होणं
वाटं पाहून दिवसाचे माझ्यासाठी मंद होणं
ध्वनि तेजातं त्याचं न्हाउन निघण,
थकल्या गात्रानी माझं निजणं
त्याचं अक्षांश रेखांशाच्या जाळ्यात गुंतुन ज़ाणं
त्याच्याकडे पाहतं माझं आपलं पुट्पुट्णं
"आपलही नातं ह्या जाळ्यात गुंतल्यासारखचं"
अन त्याचं दिलखुलास हसुन उत्तरणं
" अगं अक्षांशा प्रमाणे दोन्ही ध्रुवांवर भेटायचं
आधीच ठरलय आपलं,
त्यासाठी रेखांशाप्रमाणे काही काळासाठी हे समांतर जगणं"
मागे वळून पाहिलं,कुणीच नव्हतं,
तेव्हा कुठे मला उमगलं
"आवाजाच्या वेगापेक्षाही प्रकाशाचा वेग अधिकच"

मुक्ता (9 सप्टेंबर 2011)
Friday, 9 September 2011 at 00:23

सारीपाट

सोळा शृंगार करून,
हलक्याच पावलानं माप ओलांडून,
चौसष्ट दालनात प्रवेश केला.

मन थरारलं !
श्वेतांबरा की कृष्णा ? मी कोण?
समोर दिसतय ते सत्य की आभास ?

एक आवाज दुमदुमला .....लढ !
जिंकायचे असेल तरी वा नसेल तरी....लढ !

का लढू ? कशासाठी ? कोणासाठी ?
मनात विचारांचे आढे वेढे,
नवखी मी , पाउल पडले नकळत पुढे.
एकच गदारोळ सुरू झाला.
हल्ला हल्ला गलका झाला.

मागे वळुन पाहिले,
सारे दरवाजे बंद !
चित्त भानावर ...
मी सत्य असत्याच्या पटावर .
जुनाच डाव नव्याने सुरू .
अग्निवेदि वरचा मंत्र घोष निनादु लागला,
"कार्येषु मंत्रि करणेशु दासी....."
शृंगाराचे शस्त्र केले,
शिल राखून वार केले.
कधी साधी सरळ चाल.
तर कधी अश्वारुढ वाटचाल.
कधी गजगामिनी,
तर कधी अनुगामिनी.

सपासप वार,
मरणालाही आनंदाची किनार !
मनात सलणारा जुना घाव,
एक चाल हारल्यावरही ,जिंकल्याचा आव !

झुंजत गेले ,लढत गेले.
सारे संपवून, जुन्या शल्याचे दमन केले...!


मुक्ता पाठक शर्मा..
 Thursday, 5 April 2012 at 23:21 

घे जरा विसावा

 

घननिळा सावळा,
जलदालींचा मेळा,
मेघराजी वेल्हाळा,
बीलगुनी धरणीला, घे जरा विसावा ! 

 खळखळ निर्मळ निर्झर.
आरास पाणी भर्जर .
जणू टाळ चिपळी गजर ,
मिसळुनी त्या सागरा , घे जरा विसावा !  

लवलव हरित तरूवर.
कंच पाचूंचा गहिवर ,
फळाफुलांची धरोवर ,
जन्मुनी पुन्हा मातीत, घे जरा विसावा !  

आकाश रंग पंखावरी,
पाखर नक्षी नभावरी,
उंच उंच घेई भरारी,
भेदुनी त्या गगना, घे जरा विसावा !

 मुक्ता पाठक शर्मा.
 Friday, 6 April 2012 at 22:55

तेव्हा तुझी आठवण येते


गरगर फिरते झाड मुळाशी
काळोखाचे गुज ओजसी ,
जेव्हा उमलते क्षितिजापाशी
,तेव्हा तुझी आठवण येते ......


आकाशीचा टीमटीम तारा,
घेउनी नक्षत्रांचा भारा ,
गरगर फिरतो त्या बिंदूशी ,
तेव्हा तुझी आठवण येते.........


सुकल्या डोहाच्या तळाशी,
गुंजे लहर विराणीशी,
फडफडे दिवा भग्न गाभा-याशी ,
तेव्हा तुझी आठवण येते.......


मुक्ता पाठक शर्मा ...
Thursday, 12 April 2012

जिद्द

जरी शोषीले प्रतिबिंब ,
पाण्याने आकाशाचे.
त्या आकाशाला बंधमुक्त करण्याची
जिद्द मनात आहे !

नभोमंडळी गुर्मीत फेकले,
त्याने कण प्रकाशाचे.
सारे समेटुन सूर्य बनवण्याची,
जिद्द मस्तकी आहे!

कोवळे चिताभस्म लेपूनी,
प्रवास काळोखात आहे.
त्या काजळीला तेजदान देण्याची
जिद्द चित्तात आहे !

जिथे संपली ह्या नश्वरतेची
हद्द आहे.
त्या काळालाही गळा भेटूनी,
जिद्द जिंकण्याची आहे !

मुक्ता पाठक शर्मा.
06/05/2012