Saturday, March 9, 2013

मनास खुळ्या



मनास खुळ्या लागले वेड "काळ्या मातीचे".
बिज रुजवुनी, गीत गाईन मातीचे.
उंच उंच जाऊनी जरा झुकेल आकाशी,
मातीस मागेल जागा "माझी जराशी".

मनास खुळ्या लागले वेड "झिम्माड वा-याचे"
रेखेल मातीच्या अंगणी रिंगण फुगडीचे.
कोप-यात क्षितिजाच्या जाउन जरा बसेन.
ओंजळीत माझ्या सूर्य ढळता आणेन.

मनास खुळ्या लागले वेड "निळ्या आकाशाचे"
निलवर्ण लेवुनी माळेन केसात पिस मयुराचे.
मातीतून उभारीन पुन्हा मधुबन जुनेच नव्याने.
कणा कणात मागेन मातीला सूर "माझ्या सानिकेचे".

मनास खुळ्या लागले वेड "नितळ पाण्याचे"
मातीतूनी स्त्रवेल घेउन प्रतिबिंब आकाशाचे.
जलदालीचा पुर सारा सामावुनी घेइन.
सागराच्या पाण्याला थोडासा गोडवा देइन.

मनास खुळ्या लागले वेड "दिव्य तेजाचे"
भाळी बिंबविन कुंकू त्याच्याच अमरत्वाचे.
निजे्न पुन्हा पुन्हा जेव्हा मातीच्या कुशीत,
लुकलुकत राहिन सदैव आकाशाच्या प्रांगणात.

मुक्ता शर्मा
सिंगापूर
१६ -१०-२००८
९.४८

आकाश


आकशाच्या पायरीवर
एक पाउल टाकले
आणि कळलेच नाही
की मी आकाश झाले..

आकाशाचे लिंपण
अंगावर लिंपत गेले..
.
.
आता कोणत्या
विश्वव्यापी पोकळीला
व्यापून उरणार होते
हे सुद्धा निळाइला
कळले नाही...

मग ,
उरुन पुरणार की
पूरुन उरणार?
हे समजायचे भानही
निळाईतून सुटले नाही..

शिल्लक राहिलेल्या
दोन चार चांदण्या
आणि एखाद दूसरा चंद्र सूर्य
दान देऊन टाकला..
संपले सर्व काही..
तर समोर पुन्हा अफाट दरी
निळी निळी
आणि त्यात मूर्ती सोवळी..

मुक्ता

Wednesday, March 6, 2013

कोल्हाटीण

झिम्माड वार कसं, पदराला झोंबतयं.
लव लव पात, बघ वा-यावर डोलतयं.

सावर सावर म्हणत, जीवाला सावरतेयं.
चार काठी दोरीवर, स्व:ताला तोलतेयं.

फड फड डफलं, दादला वाजवतोयं .
दमादमानं पाऊल,  माझं पुढं पडतयं.

जगवायच म्हणजी, एक कसरतच हायं.
कुणाला सांगु ह्यो ,खेळाचा नियमच हायं.

रडू नको बाळे माझे, दुधाचा तोष हायं.
डोळा पाणी आलं तर, खेळाच मोल जायं.

मुक्ता

Friday, May 11, 2012

ठिगळं




उसवलेल्या आकाशाला
मी शिवत बसले होते..
आणि तू .....
दुसरे टोक उसवत जात होता.
;
;
तरी ठिगळावर ठिगळं
अन आकाशाला साधांयचा
खुळा अट्टाहास.
.
.
कधी कुणाला सगळ आकाश मिळालय का?

मुक्ता
Feb 18, 2009  

ओलीचिंब

वर्षा राणी
पाणी पाणी
पानो पानी
हिर्वी गाणी

हिर्वी हिर्वी
वसुंधरा
ओलाविंब
गंध सारा

गंध मंद
मृदगंध
आसमंत
चिंब धुंद


चिंब चिंब
ओली नक्षी
खोप्यामध्ये
सारे पक्षी


सारे झरे
मंजुळले
काठोका्ठी
बहरले

बहरला
गिरी माथा
ऊन झाले
शांत आता

शांत उन
ओले आता
बोले मौन
ओले होता

ओली ओली
पाय वाट
साजणाची
पाहे वाट

वाटेलाच
विचारीते
आहे कोठे
नाथ माझा
;
;
माझ्या विना
त्याची सुद्धा
विझलेली
प्राण गाथा
;
;

प्राणातही
जीते आता
धग धग
ओली तीची
;
;
;
ओल्यातच
जळालेली
प्राणांचीच
समिधाही
;
;
समिधांची
हविशाही
तिच्यातच
स्वहा लेली

स्वहा झाला
प्राण आता
उरे अंती
काय आता
;
;
काय देउ
आता तुला
माझे मला
गेले राया
;
;
गेलेल्या त्या
राउळाची
उरे फक्त
भग्न रास
;
;
भग्न राशी
आसुसल्या,
तेलवात
दिवा लावा
दिवा जळे
सारी रात
उरे अंती
काळी रेघ
;
;
काळी रेघ
काजळाची
काळजात
दाटे मेघ
;
;
मेघनाद
निनादतो
रिक्त झाल्या
अंतरात
अंतरात
मग फुले
एक ज्योती
आनंदाची
;
;
आनंदाच्या
वाटेवरी
रेलचेल
वचनांची
;
;
वचनांच्या
जोडीलाही
हात तुझा
होता हाती
;
;
हात घेता
हृदयाशी
हुंकरही
दाटलेले
;
;
दाटलेल्या
नभी आता
थेंब थेंब
दान देते
देता घेता
वचनांची
सरे कशी
सारी रात
;
;
रातीच्याही
सोबतीला
चांदव्याची
मत्त रेषा
;
;
रेषा कृष्ण
कुंतलाच्या
भाळावरी
भाळलेल्या
;
;
भाळलेल्या
तुझ्या रुपा
माझा मला
वाटे हेवा.
हेवा वाटे
मनो मनी
तुझा स्पर्श
तनो मनी
;
;
तनो मनी
बहरला
रान थवा
पाखरांचा
;
;
पाखरांच्या
साथीला ग
टिमटिम
काजव्यांची
काजवाही
विझला ग
किर्र रात
माथी चांद
;
;
चांद तोही
मातेल ग
रुप तुझे
झाक ना ग
;
;
झाक तुझे
यौवनही
लागेल ग
दृष्ट त्याला
;
;
दृष्ट काढे
रात राणी
ओवाळुनी
प्रेमफुले
प्रेमगीते
नि:शब्दाची
गात राहु
सारी रात
;
;
रातीच्याही
साथीलारे
चांदवा तो
देई साथ
;
;
साथी तुझ्या
माळेल रे
चांदव्याची
चांद वे्ली
;
;
वेलीवरी
उजळेल
शुक्राचीही
चांदणी रे;
;
चांदणीच्या
ओठी आता
तुझी माझी
प्रित गीता.
प्रेम गीता
पावरीची
राधेचीही
मिरेचीही
;
;
मिरा भक्ति
राधा शक्ति
राया तुझी
मीच प्रीती
;
;
प्रीती रीती
ना जाणते
तव प्रेमा
आसुसते
;
;
आसुसल्या
माझ्या डोळा
लागला रे
तुझा लळा
;
;
तुझी आता
होउ राहे
मनस्विनी
मानसिही

.
मानसिच्या
मंदिरीही
दिवा जळे
सारी रात
;
;
सा-या राती
गाती आता
साजणाची
प्रेम गाथा
;
;
प्रेमा संगे
अधरांची
विणा वाजे
मधुरशी
;
;
मधुरत्या
सूरामध्ये
दिवा वात
तेजाळते
;
;
तेजाळल्या
दिशांनाही
अर्थ नवा
लागे लागे


लागलेल्या
अर्थालाही
गर्भात मी
जोपासते
जोपासले
कोंब सान
त्याला पाती
फ़ुटे छान

फ़ुटताना
धुमारे ते
मन झाले
रूण झुण

ऋण सात
जन्मांचे हे
कसे कुठे
फ़ेडू सांग

सांग गडे
कोणासाठॊ
मांडला हा
खॆळ छान
खेळ छान
मांडियला
साजणारे
तुझ्यासाठी
;
;
तुझ्यासाठी
सारी दु:खे
सुख केली
पापणीने
;
;
पापणीच्या
मायेखाली
प्रीत राहो
सदा ओली
;
;
ओली ओली
ओलीचिंब
तुझी नाथा
वेडी राणी
;
;
वेडी राणी
गायी गाणी
डोळा आले
बघ पाणी
पाणी वाहे
झुळझुळ
आठवांची
हुळहूळ
;
;
हुळहुळे
मन माझे
सख्या कारे
टाकी जाळे
;
;
जाळ्यातल्या
आठवांना
पाखरांची
पंखजोडी
;
;
पंखामध्ये
साठविले
रान सारे
तुझ्यासाठी
;
;
तुझ्यासाठी
जीव माझा
मन माझे
प्राण माझे
;
;
प्राणातही
ज्योत जळे
घेता घेता
तुझे नाम
तुझे सारे
सारे काही
माझे आता
काही नाही
;
;
काही क्षण
फुललेले
काही क्षण
मिटलेले
;
;
मिटलेल्या
क्षणांतही
तुझे रुप
साठलेले
;
;
साठलेल्या
रुपांतही
माझे मन
गुंतलेले
;
;
गुंतलेल्या
मनातही
प्रेमधागे
गुंफलेले
;
;
गुंफलेल्या
धाग्यातरे
बिज बघ
अंकुरले
अंकुरले
बीज आणि
जन्म जणु
सार्थ झाला

.

झाले मन
कृतकृत्य
जीवनाला
रंग आला

.

असा रंग
बहरला
गीत स्फ़ुरे
हळुवार

.

हळुवार
गीत गाता
तनु डोले
लयदार

.

लय अशी
सापडता
काया झाली
धन्य धन्य

.

धन्य धन्य
काया होता
श्वास झाले
धुन्‍द फ़ुन्‍द !
धुंद फुंद
मिती झाल्या,
मति तिथे
गुंगलेल्या
;
;
गुंगलेल्या
क्षणांवरी
मोहजाल
कशाचेरे
;
;
अशी कशी
मी रे राया
तुझ्या साठी
आतुरले
;
;
आतुरल्या
नयनीही
अंकुरला
बिज दिसे
;
;
बिज पोटी
वाढे वाढे
नाते असे
दृढ व्हावे
13 Feb 2009 - 4 March 2009
Mukta Pathak Sharma



एकली






एकली उभी कदंबाखाली
ओलांडूनी गावाची वेस !
प्रश्नांची गर्दी डोळ्यात दाटली
माथ्यावर भूरभूरती केस !
अबोल बन्सुरी ती बोलू लागली
नाथा का धरीला परदेस ?

14-04-2012
मुक्ता पाठक शर्मा 

पिंपळ पानावरची जाळी




पिंपळ पानावरची जाळी
अनाम संकेत लेवून आली.
दाबून राहिल्या हुंकाराला
अवचित नवी बोली कळली.
पिंपळ पानावरची जाळी

आभाळ घाई मलाच होती.
आठवांची पाने मिटली.
खूण तुझी मागे सरली.
पानातच पान सुकून उरली.
पिंपळ पानावरची जाळी

नकळत आज धूळ झटकली
उगाच सारी पाने पलटली
स्मृतींनी तव मी गहिवरली.
नयनी माझ्या सय दहीवरली.
पिंपळ पानावरची जाळी


का कधीच कळले नाही?
तू शिंपली होती इत्तर शाई.
मधल्या रेषेभोवती होती.
तुझ्या खुणांची घन वनराई.
पिंपळ पानावरची जाळी
अनाम संकेत लेवून आली.

14/04/2012
मुक्ता पाठक शर्मा